हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतेच मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरातून त्यांचा निषेध होऊ लागल्यानंतर अखेर आज राज्यपालांनी माफी मागितली आहे. “माझ्याकडून चूक झाली, मी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागतो, असे म्हणतं राज्यपालांनी एक प्रसिद्ध पत्रक काढले आहे.
राज्यपाल कोश्यारी यांनी ट्विट केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे की, दि. 29 जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे.
गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. परंतु, त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही. महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो, असे राज्यपालांनी म्हंटले.
निवेदन pic.twitter.com/dWhArBBEnK
— Bhagat Singh Koshyari (@BSKoshyari) August 1, 2022
राज्यपालांनी नेमकी काय केली होती टीका?
मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले. यावेळी आपल्या भाषणात राज्यपाल कोश्यारी म्हणाले, “कधी कधी मी इथल्या लोकांना बोलतो महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही,” असे कोश्यारींनी म्हंटले.