“मोदीजी… मला राज्यपाल पदातून मुक्त करा”; भगतसिंह कोश्यारींचे पंतप्रधानांना पत्र

Bhagat Singh Koshyari Narendra Modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून वादग्रस्त वक्तव्ये केली जात असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती. दरम्यान आता खुद्द भगतसिह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांच्याकडे राज्यपाल पदातून पदमुक्त करण्याची विनंती केली आहे.

राज्यपालांनी पंतप्रधानांकडे पदमुक्त करण्याची विनंती केलेलय पत्राबाबत राजभवनाकडून जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून म्हंटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच मुंबई दौरा पार पडला. या दौऱ्यावेळी मुंबईत राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन आणि चिंतनात व्यतीत करु इच्छितो, अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्राकातून दिली आहे.

राज्यपालांनी पत्रकात म्हंटले आहे की, “महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही.

माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशीर्वाद मिळत राहिल,” असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.