मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याला संघात स्थान देण्यात आले नाही. हार्दिक पांड्याच्या खांद्याची शस्त्रक्रिया झाल्यामुळे तो मागच्या काही दिवसांपासून गोलंदाजी करत नाही आहे. तसेच त्याने शेवटची टेस्ट मॅच 2018मध्ये खेळली होती. दुखापतींमुळे आणि बॉलिंग करू शकत नसल्यामुळे हार्दिकला इंग्लंडच्या दौऱ्यात स्थान देण्यात आले नाही. त्याच दरम्यान टीम इंडियाचे बॉलिंग प्रशिक्षक भरत अरुण यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
मुंबईच्या शार्दुल ठाकूरमध्ये ऑलराऊंडर बनण्याची ताकद आहे असे वक्तव्य भरत अरुण यांनी केले आहे. हार्दिकला दुखापत झाल्यामुळे टीम इंडिया ऑलराऊंडर म्हणून पर्याय शोधत आहे तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केले आहे. ‘पुढच्या पर्यायाबाबतचा निर्णय निवड समिती घेईल, पण ठाकूरने आपला दावा ठोकला आहे. पर्याय शोधणं निवड समितीचं काम आहे, यानंतर आम्ही खेळाडूंच्या विकासावर काम करू. शार्दुलने आपण ऑलराऊंडर होऊ शकतो, हे सिद्ध केलं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये त्याने कमाल केली होती.’ असे टीम इंडियाचे बॉलिंग प्रशिक्षक भरत अरुण म्हणाले आहेत.
तसेच हार्दिक पांड्यासारखे ऑलराऊंडर सापडणे सध्या तरी कठीण असल्याचे देखील भरत अरुण यांनी मान्य केले आहे. हार्दिक पांड्या 2018 मध्ये इंग्लंडमध्येच शेवटची टेस्ट खेळला होता. यानंतर 2019 मध्ये त्याच्या कंबरेला दुखापत झाली. या दुखापतीनंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर त्याला खांद्याच्या दुखापतीने ग्रासले. यामुळे मागील काही सामन्यांमध्ये गोलंदाजी करत नाही आहे. ‘बॉलरना पांड्यासारखं करण्याची माझी इच्छा आहे. हार्दिकमध्ये खूप प्रतिभा आहे, पण त्याच्या कंबरेवर शस्त्रक्रिया झाली आहे, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये पुनरागमन करणे एवढे सोपे नसते,’ असेदेखील भरत अरुण म्हणाले आहेत.