मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधत त्यांना पक्षप्रवेश दिला. यावेळी खासदार संजय राऊत, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. भास्कर जाधव यांचे शेकडो कार्यकर्तेही मातोश्रीवर हजर होते. भास्कर जाधव यांच्या ‘घरवापसी’ने त्यांच्या काही जुन्या आठवणींनाही उजाळा मिळाला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीत माझं कोणाशी भांडण नाही, कोणावर आक्षेपही नाही. मी मुळात कट्टर शिवसैनिक आहो. मी मुळात शिवसैनिक असल्याने माझे मन स्वस्थ बसू देत नव्हते. मधल्या काळात गैरसमज निर्माण झाल्याने मी शिवसेनेतून बाहेर पडलो. मात्र माझी चूक मला कळली असल्याने परत शिवसेनेत दाखल झालो आहे, असे भास्कर जाधव शिवसेना प्रवेशानंतर म्हणाले.
भास्कर जाधव याच्या शिवसेना प्रवेशामुळे राष्ट्रवादीला कोकणात चांगला मराठा नेताच उरला नाही. गुहागर मतदारसंघातून रामदास कदम यांना २००९ साली राष्ट्रवादीच्या भास्कर जाधव यांनी पराभूत केले होते. त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी रामदास कदम त्यांच्या विरोधात शिवसेनेतून आपल्या मुलाला उमेदवारी मागत होते. त्याच्या या सर्व हालचाली बघून भास्कर जाधव यांनी स्वतःच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना आता विधानसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.