मुंबई प्रतिनिधी । मागील सरकारच्या काळात भीमा-कोरेगाव येथे झालेल्या दंगलीत दलित चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळं या प्रकरणाची पुन्हा चौकशी करून सदरचे गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारकडे केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत एक विडिओ जारी करत मागच्या सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ‘भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणात आंबेडकरवादी चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न मागच्या सरकारनं केला आहे. आंबडेकरी विचारधारेच्या दलित चळवळीच्या उच्च जातीतील लोकांना अर्बन नक्सलच्या आरोपाखाली चुकीच्या पद्धतीनं अटक केली गेली आहे.
तसेच दलित, वंचित चळवळीविषयी यांच्या मनात हीन भावना सर्वश्रुत आहे. यातूनच भीमा-कोरेगाव प्रकरणात केल्या गेलेल्या अटक चुकीची आहे याची मला खात्री आहे. त्यामुळं पुन्हा चौकशी करून सर्वाची सुटका करावी” अशी मागणी जितेंद्र आव्हाडांनी सरकारला केली आहे.