हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईला आले होते. शहांच्या या मुंबई दौऱ्यावेळी त्यांच्या सुरक्षेबाबत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. आंध्र प्रदेशातील एका खासदारांचा PA असल्याचे सांगत एक व्यक्ती बराच वेळ अमित शहांच्या अवती भवती फिरत होता. संशय आल्यानंतर अखेर पोलिसांना त्याला ताब्यात घेतलं. हेमंत पवार असं सदर व्यक्तीचे नाव असून तो धुळे जिल्ह्यातील रहिवासी आहे.
अमित शाह हे 4 आणि 5 ऑगस्ट रोजी मुंबई दौऱ्यावर होते. या दरम्यान त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती. अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात मोठी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली होती. मात्र, याचवेळी एक व्यक्ती शाह यांच्या अवती भोवती फिरत होता. आपण आंध्र प्रदेशातील खासदाराचे PA असल्याचे त्याने सांगितले होते. मात्र, मंत्रालयातील एका अधिकाऱ्याला या व्यक्तीवर संशय आल्याने त्यांनी मुंबई पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करत त्या व्यक्तीला अटक केल. हेमंत पवार असं त्या व्यक्तीचे नाव असून तो धुळे जिल्ह्याचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याला गिरगाव कोर्टासमोर हजर केलं. कोर्टानं हेमंत पवार याना पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. दरम्यान, शाह यांच्या अवतीभवती फिरण्याचा त्याचा नेमका हेतू काय होता याची चौकशी पोलीस करत आहेत.