हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहून आम्हांला हिंदुत्व शिकवू नका, तुमच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही असं म्हंटल होत. तरीही काँग्रेस- राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडीमध्ये बसलेल्या शिवसेनेवर भाजपकडुन अधून मधून हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून टीकास्त्र सोडलं जात. आता एका कॅलेंडरमुळे पुन्हा एकदा भाजपा नेते अतुल भातखळकर शिवसेनेवर टीका करताना दिसत आहेत.
भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी आज एका कॅलेंडरचा फोटो पोस्ट करत शिवसेनेवर टीका केली आहे. या कॅलेंडरवर शिवशाही कॅलेंडर २०२१ असं लिहिलं आहे. कॅलेंडरच्या वरच्या दोन कोपऱ्यांमध्ये शिवसेना आणि युवासेना असंही नमूद करण्यात आलं आहे. परंतु, आश्चर्याची बाब म्हणजे हे कॅलेंडर मराठी, इंग्रजी याचसोबत उर्दू भाषेतही आहे. कॅलेंडरवर इंग्रजी महिन्यांच्या शेजारी इस्लामिक महिना आणि इतर बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. याच कॅलेंडरचा फोटो पोस्ट करत, ‘शिवसेनेला हिंदुत्वाच्या सर्टिफिकेटची गरज नाही….’, असा खोचक टोला भातखळखर यांनी लगावला आहे.
शिवसेनेला हिंदुत्वाच्या सर्टिफिकेटची गरज नाही…. @OfficeofUT pic.twitter.com/HPbspXSq5Y
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 31, 2020
भाजपाचे नेते अतुल भातखळकर कायमच आपल्या तिखट शब्दांतील माऱ्यासाठी ओळखले जातात. शिवसेनेवर टीका करण्याची संधी ते कधीही सोडत नाहीत. आता त्यांच्या या टीकेला शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर येतेय हे पाहणे महत्त्वाचे आहे.