हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यांतील 2 हजार 359 ग्रामपंचायत निवडणूकांची मतमोजणी सुरू झाली आहे. त्यानुसार एक एक निकाल समोर येत आहेत. सध्या हाती आलेल्या निकालानुसार, यंदा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपने बाजी मारली आहे. तर शिवसेनेतून बाजूला पडल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने देखील विजय मिळवला आहे. परंतु दुसऱ्या बाजूला, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शरद पवार गटाच्या हाती निराशा आल्याचे दिसत आहे. तर अजित पवार गटाने बारामती तालुक्यात बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे.
आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपने यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये 304 जागांवर विजय मिळवला आहे. यासोबत शिवसेनेच्या शिंदे गटाने 151 जागांसाठी बाजी मारली आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने 215 जागा काबीज केल्या आहेत. तर शरद पवार गटाला 68 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने, 85 ग्रामपंचायत जागांवर विजय मिळवला आहे. यातून हे स्पष्ट दिसून येते की यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप अव्वल स्थानी ठरले आहे.
बारामती निकाल
राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर यंदाच्या निवडणुकीमध्ये अजित पवार की शरद पवार गट गुलाल उधळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानुसार, यंदा बारामतीत अजित पवार गटाने वर्चस्व प्रस्थापित केल्याचे स्पष्ट झाले आहे. बारामती तालुक्यातील एकूण 23 ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला आहे. या निकालानुसार, म्हसोबा नगर, पवई माळ, आंबी बुद्रुक, पानसरे वाडी, गाडीखेल, जराडवाडी,
करंजे, कुतवळवाडी, दंडवाडी, मगरवाडी, निंबोडी, साबळेवाडी, उंडवडी कप, काळखैरेवाडी, चौधरवाडी, वंजारवाडी, करंजे पूल, धुमाळवाडी, कऱ्हावागज, सायबाचीवाडी, कोराळे खुर्द अशा 23 पैकी 22 ग्रामपंचायत जागांवर अजित पवार गटाने विजय मिळवला आहे. तर, चांदगुडेवाडी ग्रामपंचायतमध्ये भाजपचा सरपंच निवडून आला आहे.