राजू शेट्टी भाजपसोबत आल्यास स्वागतच करू; चंद्रकांत पाटलांची ऑफर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर नाराज असून ते महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. येत्या 5 तारखेला आपण याबाबत कठोर निर्णय घेणार आहोत अस राजू शेट्टी यांनी म्हंटल. त्याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टी यांना भाजपसोबत येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे राजू शेट्टी नेमकं काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपची काही ध्येय धोरणं राजू शेट्टींना पटली नव्हती. त्यावर चर्चा करू. पण मोदींवर टीका करू नका अशी विनंती आम्ही त्यांना केली होती. पण ते बाहेर पडले. महाविकास आघाडी सरकार शेतकरी विरोधी आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी महाविकास आघाडी सोडली आणि भाजपसोबत येण्याचा विचार केला तर आम्ही त्यांचं स्वागत करू, असं पाटील यांनी म्हटलं होतं

राजू शेट्टी यांची नाराजी
दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी सरकार कडून निराशा झाली असून येत्या 5 तारखेला होणाऱ्या बैठकीत आपण कठोर निर्णय घेणार आहोत असे विधान राजू शेट्टी यांनी केलं. सत्तेत राहून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसतील तर अशी सत्ता नकोच आहे अशी भूमिका त्यांनी मांडली. मी आमदारकीच्या आशेवर बसलो नाही, मला आमदारकी नाही मिळाली तरी फरक पडत नाही असं राजू शेट्टी म्हणाले.