हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील हाडवैर जगजाहीर आहे. चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळ यांना धमकीवजा इशारा दिल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा चंद्रकांत पाटलाना दिला होता. त्यावर पाटील यांनी पुन्हा एकदा पलटवार केला आहे.
हसन मुश्रीफ यांनी माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला आणि मी हारलो तर त्यांना मलाच विकून पैसे वसूल करावे लागतील, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले.तसेच मुश्रीफ यांनी माझ्यावर खुशाल अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा. मी त्याला घाबरत नाही. पण माझी सर्व प्रॉपर्टी विकली तर 100 कोटी काय 1 कोटीही मिळणार नाहीत असेही ते म्हणाले.
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यासंदर्भात एक वक्तव्य केले होते. तुम्ही जामिनावर बाहेर आहात, त्यामुळे सांभाळून बोला, असा सूचक इशारा चंद्रकांतदादांनी दिला होता. यावर हसन मुश्रीफ यांनी आक्षेप नोंदवला होता. लोकशाहीमध्ये अशाप्रकारे धमकावणे योग्य नाही. गेल्यावेळीही चंद्रकांत पाटील यांनी आमचा अपमान केला होता. त्यामुळे आता मी त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटले
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.