समृद्धी महामार्गावरून माझं नाव कोणालाही मिटवता येणार नाही- फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | फडणवीस सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा ठाकरे सरकारच्या कार्यकाळात पूर्ण होत आहे. महाराष्ट्र दिन अर्थात येत्या 1 मे रोजी समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पावरून श्रेयवादाची लढाई सुरू असतानाच कोणी कितीही प्रयत्न केले तरी समृद्धी महामार्गमधून माझं नाव मिटवू शकणार नाही असे विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

फडणवीस म्हणाले, गेली वीस वर्षे ही संकल्पना माझ्या डोक्यात होती. जेव्हा राज्याचे जनतेने मुख्यमंत्री म्हणून संधी दिली तेव्हा तो महामार्ग बांधला. त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केले तरी समृद्धी महामार्गमधून माझं नाव मिटवू शकणार नाही. तसेच तेव्हा समृद्धी महामार्गाला जे लोक विरोध करत होते आज तेच लोक श्रेय घेण्यासाठी उद्घाटनाची तयारी करत आहेत असा टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान, 1 मे ला ठाकरे सरकार कडून समृद्धी महामार्गाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती मिळत आहे. पण समृद्धी महामार्गाची सर्व कामं अद्याप पूर्ण झालेली नाहीत. ती काम पूर्ण करूनच या महामार्गाचे उद्घाटन झाले पाहिजे. घाईघाईत समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले तर अपूर्ण कामांमुळे या महामार्गाचे महत्त्व कमी होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल.