हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यावेळी भाजपनेते नारायण राणे यांनी शपथ घेतली. त्यांच्या शपथविधीनंतर त्यांचे पुत्र नितेश राणे व निलेश राणे यांनी माध्यम प्रतिनिधीना पहिली प्रतिक्रिया दिली. “काँग्रेसने अनेकवेळा नारायण राणे यांना शब्द दिला. मात्र, तो पूर्ण केला नाही. राणे यांचा प्रशासनावर असलेली पकड ही महत्वाची आहे. बारा वर्षे काँग्रेसला समजलं नाही ती भाजपला दीड वर्षात समजले. जे काँग्रेसने करून दाखवलं नाही ते भाजपने ते करून दाखवलं,” असा टोला निलेश राणेंनी काँग्रेसला लगावला.
दिल्लीत बुधवारी पार पडलेल्या मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीत नारायण राणे यांचे नाव पहिल्या क्रमांकावर होते. यावेळी राणेंनी शपथविधी घेतल्यानंतर त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. यानंतर त्यांचे पुत्र नितेश राणे व निलेश राणे यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला. तर राणेंच्या समर्थकांनी रत्नागिरी, कोकणात जल्लोष साजरा केला.
यावेळी निलेश व नितेश राणे यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी निलेश म्हणाले कि, मंत्रिपद हा मोठी जबाबदारी आहे. नारायण राणे यांनी नगरसेवक पदापासून ते केंद्रीय मंत्रिपद इथपर्यंतचा त्यांचा प्रवास हा महत्वाचा आहे. हे येड्या गबाळ्याचे काम नाही. नारायण राणे व राणे कुटुंबियांना संपवण्याची कुणाच्यात ताकद नाही. ते अश्यक्य आहे. अनेक जन्म संपवण्यासाठी विरोधकांना घ्यावे लागतील, अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर टीका केली.