काल जन्माला आलेले नेते, आम्हाला अक्कल शिकवू लागलेत! खडसेंची फडणवीसांचे नाव न घेता टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव । काल जन्माला आलेले नेते आता राजकारणात चमकायला लागले आहेत आणि आता आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत अशा शब्दांत भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. महाराष्ट्राच्या जनतेत आणि मला मानणाऱ्यांमध्ये एक संताप आहे. या संतापाचं कधी एकत्रीकरण होऊन स्फोट होईल हे सांगता येत नाही असा सुचक इशाराही खडसे यांनी दिला आहे. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

“निव्वळ मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार ही गोष्ट जनतेला आवडली नाही का ? कोणत्या कारणासाठी ? याचा शोध मी घेत आहे. मेहनत आणि कष्टाने आम्ही महाराष्ट्रात भाजपाचं एकट्याच्या बळावर सरकार आणलं होतं. त्या कालखंडात आत्ता आहेत त्यातील अनेक लोक नव्हते सुद्धा. हे अलीकडे १०-१२ वर्षात जन्माला आलेले राजकारणात चमकायला लागले आहेत आणि आम्हाला अक्कल शिकवत आहेत”, अशी बोचरी टीका एकनाथ खडसे  यांनी केली.

“मी गेल्या ४० वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ आहे. पण पक्षाने माझ्यावर अन्याय केल्याची भावना आहे. महाराष्ट्राच्या जनतेत आणि मला मानणाऱ्यांमध्ये एक संताप आहे. या संतापाचं कधी एकत्रीकरण होऊन स्फोट होईल हे सांगता येत नाही,” असंही खडसे यांनी म्हटलं आहे. करोनाचं सावट दूर झाल्यावर सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.