“आर्यनसाठी पत्रकार परिषद घ्यायला वेळ मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे अश्रू पुसण्यासाठी नाही.”; गोपीचंद पडळकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यानंतर भाजप नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपुरात ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. अशा वेळी ठाकरे सरकारमधील एकही मंत्री एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे अश्रू पुसण्यासाठी गेला नाही. मात्र हेच मंत्री आर्यन खानची काळजी घेण्यामध्ये व्यस्त आहेत, अशी टीका पडळकर यांनी केली आहे.

भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूर येथे एसटी कर्मचाऱ्यांकडून केल्या जात असलेल्या आंदोलनास भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “आर्यन खानच्या प्रकरणात ठाकरे सरकार जिवानीशी लढत होतं. आर्यन जेवला का?, आर्यन काय खातोय? आर्यन कुठंय? आर्यन कसा सुटला पाहिजे?, रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ ते पत्रकार परिषद घेत होते. ते आर्यनची बाजू घेत होते. त्यांना आर्यन महत्वाचा आहे पण 28 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या ते त्यांना महत्वाचे नाहीत,”

एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. याच प्रश्नावर कालपासून राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. पण राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांमध्ये फूट पाडून संप मोडीत काढला आहे.

आज अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे.‌आतापर्यंत राज्यात अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र आत्तापर्यंत एकही राज्य सरकारचा मंत्री आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेलेला नाही. त्यांना कोणतीही मदत केली नाही. संवेदनशीलता नावाची गोष्टच सरकारकडे शिल्लक राहिलेली नाही,” असं पडळकर म्हणाले आहेत.

You might also like