हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यास हेक्टरी फक्त दहा हजारांपर्यंतची मदत जाहीर करण्यात अली आहे. या मदतीवरून आता भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान भाजप नेते तथा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “संकटकाळात शेतकऱ्याला भुलवून खोटी आश्वासने देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने याचे उत्तर द्यावे, अशी टीका विखे पाटील यांनी केली आहे.
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, अतिवृष्टीमुळे व महापुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यातील ५५ लाख हेक्टरहून अधिक शेत जमिनींवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याची सरकारची प्राथमिक आकडेवारी आहे. प्रत्यक्षात १०० लाख हेक्टरहून अधिक जमिनीवरील पिके पूर्ण नष्ट झाली आहेत. महाविकास आघाडी सरकार हेक्टरी दहा हजार रुपयांच्या फसव्या मदतीची पाने पुसून शेतकऱ्याची थट्टा करत आहे. जाहीर केलेल्या मदतीपैकी फुटकी कवडी देखील शेतकऱ्यापर्यंत पोहोचली नाही.
यावेळी विखे पाटलांनी महाविकास आघाडी सरकार सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, आघाडी सरकार हे शेतकऱ्यांचे बळी घेणारे सरकार ठरले आहे. या सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला आहे. शेतकऱ्याची दिवाळी काळी करण्यास महाविकास आघाडी सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत ठरला असल्याचा आरोप विखे पाटलांनी केला.