हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भाजप नेत्यांकडून या ना त्या कारणांनी निशाणा साधला जात आहे. आज भाजप नेते तथा शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. अभिनेत्री सपना चौधरी हिने केलेल्या नृत्याचे व लगावलेले ठुमके मंत्री धनंजय मुंडे पाहत आहेत. राज्यात एसटी कर्मचारी, शेतकरी आत्महत्या यासारखे प्रश्न प्रलंबित असताना त्यांना हे शोभत का?सामाजिक मंत्र्यांचं भान हरवलं आहे, अशी टीका मेटे यांनी केली आहे.
शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मेटे म्हणाले की, “परळीमध्ये सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सपना चौधरीचा डान्सचा कार्यक्रम ठेवला. कालच अहमदनगरमध्ये सरकारी रुग्णालयात अकरा जणांचा दुर्दैवाने आक्रोश करत होरपळून मृत्यू झाला. हि दुर्दैवी घटना घडली आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना आजही पैसे मिळाले नाहीत. त्यांची उपाशीपोटी काळी दिवाळी साजरी होत असताना हे इथे सपना चौधरीला ठुमके लगावताना धनंजय मुंडे पाहत आहेत. एसटी कामगार घर-दार सोडून आपल्या हक्कासाठी आंदोलन करत आहेत, आक्रोश करत आहेत. त्यामध्ये लक्ष घालायचे सोडून मंत्री धनंजय मुंडे सपना चौधरीला आणून ठुमके लावायला सांगत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील सामाजिक मंत्री धनंजय मुंडे यांनी सामाजिक खात्याचे सामाजिक भान राखायला हवे आहे. बीड जिल्ह्यात खूप मोठे प्रश्न उभे राहिले आहेत. त्याचा कधीतरी आढावा त्यांनी घेतला पाहिजे. कायदा सुव्यवस्था, महिला अत्याचार, अवैध धंदे, जमिनी हडपण्याचे प्रकार यामध्ये लक्ष घातले तर अधिक उत्तम होईल, असा टोलाही यावेळी मेटे यांनी लगावला आहे.