हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती, नांदेड, मालेगाव या ठिकाणी झालेल्या दंगलीमुळे तणाव निर्माण झाला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजप नेते आशिष शेलार यांचे रझा अकादमी सोबतचे फोटो दाखवीत भाजपवर गंभीर आरोप केले. मालिकांच्या आरोपांना शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “रझा अकादमीसोबतचे तुमचे सगळ्यांचे आम्ही फोटो दाखवले तर मलिकांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही !”, अशा इशारा शेलार यांनी दिला आहे.
भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करीत नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले. तसेच मलिकांवर निशाणाही साधला. यावेळी शेलार म्हणाले की, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना मी मराठीतील ती म्हण पुर्ण सांगणार नाही. पण तुमची खोड काही केल्या जात नाही. अशा पद्धतीने दरवेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या फोटोंच्या जीवावर अफवांचे राजकारण करणे हा तुमचा धंदाच आहे.
त्रिपुरात घडलेल्या घटनेनंतर महाराष्ट्रात घडलेली दंगलींचा 2016 ते 17 वर्षातील रझा अकादमीच्या नेत्यांसोबतच्या माझ्या फोटोचा संबंध काय? रझा अकादमीच्या नेत्यांशी जी बैठक झाली ती अकादमीच्या कार्यालयात झालेलीच नाही. जुना कोणता तरी फोटो काढायचा तो दाखवायचा, असले धंदे मलिक तुम्ही बंद करावे.
रझा अकादमीसोबतचे तुमचे सगळ्यांचे आम्ही फोटो दाखवले तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही! | @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/1s9vw7jKKn
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 15, 2021
आजच्या दंगलीमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या अपयशाला लपवण्याचे काम मलिकजी तुम्ही करू नये. तुमची खोड जात नसेल तर असे रझा अकादमी सोबतचे खूप फोटो आम्हाला दाखवावे लागतील. तेव्हा तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. त्यामुळे आता महाराष्ट्र विकास आघाडीने आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही फोटोचे राजकारण बंद कराहावे, असे शेलार यांनी यावेळी सांगितले.