हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “कोरोना संकट संपल्यानंतर देशात तीन तर महाराष्ट्रात असंख्य भूकंप होणार आहेत,” असा गौप्यस्फोट भाजपा नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त बोलत होते. कोरोनाचं संकट संपल्यानंतर देशामध्ये तसंच राज्यातही काँग्रेसमध्ये अनेक भूकंप होणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावरही टीका केली.
ते म्हणाले कि, “बाळासाहेब थोरात तुम्ही सांभाळा, तुमचा पक्ष जपा, तुम्हाला कुठेही भवितव्य नाही,” असा इशारा पाटील यांनी दिला. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी क्रॉस व्होटिंगची काँग्रेसची ऑफर होती असा दावा केला होता. यावरही पाटील यांनी भाष्य केलं. “राजघराण्यातील जोतिरादित्य शिंदे यांना काँग्रेसला जपता आलं नाही. तर इतरांना काँग्रेस काय सांभाळणार,” असं म्हणत त्यांनी काँग्रेसला टोला लगावला.
म्हणून नाथाभाऊंना तिकीट नाकारलं
“भाजपा हा पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रेरणा घेऊन काम करतो. आमच्या अजेंड्यामध्ये जशा वैचारिक गोष्टी आहेत, तशाच कार्यपद्धती हा आमच्या अजेंड्याचा भाग आहे. केवळ घरामधल्यांना मोठं करणं हा आरएसएसचा अजेंडा नाही,” असं सांगताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांना तिकीट का नाकारण्यात आलं याबाबत स्पष्टीकरणं दिलं आहे.
खडसेंनी पक्षात पालक, मार्गदर्शकाच्या भूमिकेत रहावं
इतक्या मोठ्या नेत्यानं पक्षाचे वाभाडे करताना विचार तर करायला हवा असं मत चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं. पक्षानं ८७-८८ पासून नाथाभाऊंना सात वेळा तिकिट दिलं. तसेच त्यांच्या मुलाला तिकिट दिलं. लोकसभा निवडणुकीच्यावेळी हरीभाऊ जावळेंना तिकिट न देता, त्यांच्या सुनेला तिकिट दिलं गेलं. त्यामुळे खडसेंवर अन्याय होत नाही असा विचार केंद्रानं बहुतेक केला असेल” असं चंद्रकांत पाटील म्हणाले. नाथाभाऊंना तिकिट द्यायला हवं अशीच माझी आणि देवेंद्र फडणवीस यांची भूमिका होती, परंतु केंद्रानंच त्यांना तिकिट नाकारलं असल्याचं पाटील यांनी सांगितलं. ”केंद्रीला चुकीची माहिती दिली असं नाथाभाऊंच म्हणणं असेल तर तुम्ही केंद्राकडे जाऊ शकता, त्यांना जाब विचारा. आमच्याकडे पंतप्रधान मोदींपासून अमित शाहंपर्यंत सर्वांशी सहज संपर्क साधता येतो” असे पाटील म्हणाले. एकनाथ खडसे यांच्याबद्दल मला आदर आहे. त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी मेहनत घेतली पण आता त्यांनी पालक, मार्गदर्शकाच्या भूमिकेत रहावं असे चंद्रकात पाटील यांनी सांगितले.
”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”