हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्यरात्री म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे ट्विट गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. तसेच पेपर फुटीचा संशय आल्याने परीक्षा पुढे ढळल्याचे त्यांनी म्हंटले. या पेपरफुटी प्रकरणावरून भाजपा नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकावर निशाणा साधला आहे. “मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ राज्य सरकावर आली आहे. सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
म्हाडाच्या परीक्षेच्या रद्दच्या निर्णयावरून देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकावर निशाणा साधला आहे. माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, अगोदर परीक्षा जाहीर करायच्या आणि नंतर त्या पेपरफुटीच्या नावाखाली रद्द करायच्या, अशा प्रकारचा काळा कारभार राज्यात सध्या या सरकारचा सातत्याने सुरु आहे. एक परीक्षाही धड यांना घेता येत नाही. मागे आरोग्य विभागाच्या परीक्षेतही तीन-तीन वेळा परीक्षा रद्द झाल्या. आताही पेपर फुटला आहे. आणि त्याचा तार मंत्रालयापर्यंत गेलेली आहे. त्यामुळे या परीक्षांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरु आहे.
या भ्रष्टाचाराच्या कारभारामुळे राज्यातील तरुणांची प्रचंड ओढाताण सुरु आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणी कडक कारवाई होणे आवश्यक आहे. पेपर फुटीच्या प्रकरणात कोण दोषी आहे? कुणावर तरी दोषारोप झाला पाहिजे. मात्र कुणावरही दोषारोप होत नाही. मंत्री नामानिराळे, मुख्यमंत्री नामानिराळे. हे चालणार नाही, याबाबत फार मोठा रोष आहे. यावर कडक कारवाई व्हावी. या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे’, अशी भूमिक फडणवीस यांनी मांडली आहे.