महाविकास आघाडीचे सरकार घाबरले आहे; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी विरोधक व सत्ताधारी यांच्यात वीजबिल प्रश्नावरून खडाजंगी झाली. अधिवेशनाचे सत्र संपल्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. “हे सरकार घाबरलेले आहे. म्हणूनच या सरकारने अध्यक्षाची निवड आवाजी मतदानाने करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यांचा स्वत:च्या आमदारांवरही विश्वास नाही,” असे फडणवीस यांनी म्हंटले.

देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाचे अधिवेशनाचे पहिल्या दिवशीचे सत्र संपताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज पहिल्या दिवशीचे अधिवेशनाचे सत्र पार पडले. आज तरी अध्यक्षाची निवड केली जाईल असे वाटले होते. मात्र, या सरकारने अध्यक्षाची निवड आवाजी मतदानाने करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यांचा स्वत:च्या आमदारांवरही विश्वास नाही. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जो प्रस्ताव आज मांडण्यात आला त्यातून हे सरकार किती असुरक्षित आहे हे लक्षात आले आहे. 60 वर्षापर्यंत अध्यक्षांची निवडणूक गुप्त पद्धतीने झाली.

अगदी जेव्हा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये फक्त 5 – 7 मतांचा फरक होता तेव्हाही ही निवडणूक गुप्त पद्धतीने झाली. परंतु 170 आमदार आमच्याकडे आहेत असं सांगणाऱ्या महाविकास आघाडीला खुल्या पद्धतीने ही निवडणूक घेण्याची नामुष्की ओढावली. कारण त्यांच्यातील असंतोष इतका भयानक आहे की त्यांना खात्री आहे की त्यांचे आमदार हा असंतोष अध्यक्षांच्या निवडणुकीत व्यक्त करतील आणि त्यांच्यावर नामुष्की ओढावले. म्हणून त्यांनी नियम बदलाचा घाट घातला असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.