जयंत पाटील, पोलिस अधिक्षकांनी माझ्या अंगावर डंपर घालण्याचा कट रचला; ‘या’ Video मुळे खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भाजप नेत्यांकडून अनेक आरोप केले जात असताना आता भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी पोलीस स्टेशन परिसरात माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच यामागे जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील पूर्णपणे सामील असल्याचा गंभीर आरोप पडळकर यांनी केला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी आज आपल्या ट्विटर अकाउंटवरून याबाबत माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, 7 नोव्हेंबर 2021 रोजी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तो हल्ला सुनियोजित होता, माझी गाडी ज्या दिशेने येत होती त्याच्या बरोबर दुसऱ्या बाजूनं 200 ते 300 लोकांचा जमाव लाठ्या काठ्यांसह उभा होता. पहिल्यांदा माझ्या गाडीवर दगडफेक करायची आणि गाडीचं स्पीड कमी झाल्यानंतर भरधाव वेगानं डंपर अंगावर घालायचा आणि जमावाकडून हल्ला करुन घ्यायचा असा सुनियोजित कट आखला गेला होता.

यामध्ये सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या हल्ल्याचा सगळा कट पोलीस संरक्षणात घडवून आणला जात आहे. हि घटना थांबवण्या ऐवजी पोलीस चित्रीकरणात मग्न होते. पोलीस अधीक्षक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्यावरचा विश्वास उडाल्याने बॉडीगार्ड न स्वीकारण्याचा निर्णय मी घेतला आहे. रक्षकच जर भक्षकात सामील झाले असतील तर विश्वास कुणावरती ठेवायचा? महाराष्ट्रातील प्रस्थापित पवार आणि पाटलांच्या विरोधातील लढा चालूच ठेवणार असल्याचा इशारा पडळकर यांनी दिला आहे.