हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावरून आज भाजपकडून महाविकास आघाडीवर टीका केली जात आहे. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “महाविकास आघाडी सरकारबद्दल सांगायचे झाले तर राज्यातील सरकार हे महाविकास नव्हे, तर महाघोटाळा आघाडी सरकार आहे. या सरकारमधील मंत्र्यांची झोप उडाली आहे. कोणी बेनामी प्रॉपर्टीसाठी आईच्या तर कोणी ताई, पत्नीचा वापर करत आहे, अशी टीका सोमय्या यांनी केली.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर टीका करताना सोमय्या यांनी म्हंटले की, मलिक एवढे का घाबरत आहेत? की ते अनिल देशमुखच्या शेजारची आर्थर रोड जेलची खोली बुक करत आहेत का? मलिकांनी वक्फबोर्ड जमिनीचा घोटाळा केला असेल तर त्यांच्यावर निश्चित कारवाई होणार. मग ते नवाब असो की मलिका. कोणत्याही घोटाळेबाजांना सोडणार नाही. मी आता आघाडी सरकारला या निमित्ताने इशारा देतो कि आता नुसती मंत्र्यांची नव्हे, तर सरकारची झोप उडणार आहे.
यावेळी सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भावना गवळी यांच्यावरही निशाणा साधला आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या बायकोच्या नावाने 19 बंगले दाखवले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बायको, ताई, मुलगा, पत्नीच्या नावावर 1 हजार 50 कोटीची बेनामी प्रॉपर्टी दाखवली. भावना गवळी देखील तेच करत आहे, यांना सोडणार नाही, असा इशारा यावेळी सोमय्या यांनी दिला.