हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आरक्षणाच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापलं असून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये आरोप – प्रत्यारोप होत आहेत. याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं राजकारण म्हणजे फक्त टाईमपास आहे. तसेच आत्ताच्या संघर्षाचे रूपांतर वणव्यात कधी होईल ते कळणारही नाही असा इशारा दरेकरांनी दिला.
मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं आंदोलन मुख्यमंत्र्यांना आदळआपट वाटते. मुख्यमंत्र्यांना संघर्ष नको असेल तर त्यांनी संवादातून मार्ग काढावा. आताचा संघर्ष ही तर केवळ ठिणगी आहे, त्याचं वणव्यात कधी रुपांतर होईल, ते कळणारही नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा विषय निकाली काढावा, असे प्रविण दरेकर यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा अध्यादेश काढून ते आरक्षण न्यायालयात टिकवलं. मराठा आरक्षणाचा कायदा करुन तो ही त्यांनी उच्च न्यायालयात टिकवला. मात्र, महाविकासआघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकवता आले नाही, अशी टीका प्रविण दरेकर यांनी केली.