हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर अनेक राजकिय प्रतिक्रिया उमटल्या असून काही भाजप नेत्यांनी खडसेंवर निशाणा देखील साधला आहे. पक्षात एकेकाळी केवळ नाथाभाऊंकडेच लालदिव्याची गाडी होती. त्यावेळी त्यांना प्रदेशाध्यपदाची ऑफर देण्यात आली होती. पण तब्येतीचं कारण सांगून त्यांनी ते नाकारलं. भविष्यात सत्ता येईल की नाही, असं नाथाभाऊंना वाटलं. त्यामुळेच त्यांचं मुख्यमंत्रिपद गेलं असावं, असा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी केला.
नाथाभाऊ भाजप सोडून का गेले याला अनेक कारणे आहेत. कुठून सुरुवात करावी हा प्रश्न आहे. एकेकाळी भाजपमध्ये केवळ नाथाभाऊंकडेच लालदिव्याची गाडी होती. त्यांना पक्षाने प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्याचे आदेश दिले होते. पण भाजपची सत्ता येईल की नाही याची शंका असल्याने नाथाभाऊंनी तब्येतीचं कारण देत लालदिव्यासाठी प्रदेशाध्यक्षपद सोडलं. त्यामुळे हे पद देवेंद्र फडणवीसांकडे आलं. भाजपमध्ये प्रदेशाध्यक्षालाच मुख्यमंत्री केलं जातं. त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्याकाळात खडसेंनी पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारलं असतं तर कदाचित त्यांना मुख्यमंत्रिपदावर दावा करता आला असता, असा गौप्यस्फोट दानवे यांनी केला.
यापूर्वी माजी मंत्री आणि जळगाव भाजपचे नेते गिरीश महाजन यांनीही खडसेंवर टीका करताना पक्ष सोडण्याची पाळी खडसेंवर का आली याचे आत्मचिंतन त्यांनी केले तर नवीन पक्षात ते सुखी राहतील, असा हल्लाबोल केला होता.तसेच खडसेंच्या जाण्याने जळगाव मध्ये भाजपला कोणताही तोटा होणार नाही असेही स्पष्ट केले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’