महाराष्ट्रात भाजपला धोका दिल्याने शिवसेना फोडली; सुशील मोदींचा गौप्यस्फोट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राजीनामा दिल्याने येथील सरकार कोसळले. त्यामुळे भाजपाला सत्तेबाहेर जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर बिहारमधील भाजपाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांना इशारा देताना महाराष्ट्रातील भाजपाने शिवसेना का फोडली? याचा मोठा खुलासा केला आहे. “महाराष्ट्रात शिवसेनेची भाजपासोबत युती होती. मात्र, त्यानंतर शिवसेनेने धोका दिल्याने त्यांना त्याचा परिणाम भोगावा लागला,” असा गौप्यस्फोट मोदी यांनी केला आहे.

भाजप नेते सुशील मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला. “अमित शाहांनी फोन केला तेव्हा त्यांनी आरसीपी सिंह यांचे नाव दिले. त्यानंतर सिंह यांना मंत्री करण्यात आले. भाजपाने नितीश कुमार यांना जेवढा सन्मान दिला तेवढा सन्मान त्यांना राजद, काँग्रेससोबत मिळू शकणार नाही. 1996 पासून पाहिले तर, अटलबिहारी वाजपेयी असो किंवा नरेंद्र मोदींचं सरकार असो, भाजपाने त्यांना सन्मान दिला. त्या सन्मानालाच त्यांनी धोका दिला.”

 

कितीही ताकद लावली तरी 2024 मध्ये मोदीच पंतप्रधान

यावेळी सुशील मोदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठे विधान केले. राजद, काँग्रेस, जेडीयू पक्ष एकत्र आले तर लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पराभूत करू असा तिन्ही पक्षांचा गैरसमज आहे. ते हे विसरत आहेत की नरेंद्र मोदींची लोकप्रियता 2014, 2019 पेक्षाही अनेकपट जास्त आहे. त्यांनी कितीही ताकद लावली तरी ते मोदींना 2024 मध्ये पंतप्रधान बनण्यापासून रोखू शकणार नाही, असे मोदी यांनी म्हंटले.