हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काश्मीर येथे होत असलेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्येवरून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. काश्मीर पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील, असेही ठाकरेंनी म्हंटले होते. यावरून आता भाजप नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी “ गेल्या अडीच वर्षांत असंख्य समस्यांनी महाराष्ट्राला घेरले. मात्र, त्याकडे लक्ष देण्याऐवजी काश्मिरी पंडितांच्या कळवळ्याचे राजकारण सुरू करून केंद्र सरकारच्या द्वेषाची कावीळ झालेल्या ठाकरे सरकारने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील समस्यांवरून जनतेचे लक्ष भरकटविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, अशी टीका उपाध्ये यांनी केली आहे.
केशव उपाध्ये यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, एकेकाळी कोरोनाच्या महामारीत हजारो कुटुंबे उद्ध्वस्त होत होती. तर दुसरीकडे सत्ताधारी शिवसेनेतील प्यादी आपल्या मातोश्रीवर कोटी रुपयांची खैरात करत होती. मोक्याच्या ठिकाणांवरील मालमत्ता हडप करण्याची कारस्थाने सुरू होती, तर काही मंत्री पोलिसांना हाताशी धरून खंडणी वसुलीच्या कामाला लागले होते. दहशतवादी व देशद्रोही कारवायांसाठी हातभार लावण्याचा कट सरकारमध्येच शिजत होता असा गंभीर आरोप उपाध्ये यांनी केला आहे.
यावेळी उपाध्ये यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त होत असताना व शेतकरी आत्महत्यांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री मात्र जनतेची जबाबदारी झटकून टाकत होते. या परिस्थितीला मी जबाबदार आहे असे प्रत्येक नागरिकास वाटावे, असे फासे धूर्तपणे टाकून मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडले आणि आता काश्मीरसारखा राष्ट्रीयदृष्ट्या संवेदनशील प्रश्नात नाक खुपसून राज्याचे लक्ष भरकटविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
स्वतःच्या अंगणात काय जळतय ते पहायला हवे
यावेळी उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांना टोलाही लगावला आहे. त्यांनी म्हंटले आहे की, जो मुख्यमंत्री महाराष्ट्रातील जनतेच्या समस्या न सोडविता भ्रष्टाचार आणि दहशतवादाची पाठराखण करतो, त्यांनी अगोदर राष्ट्रीय प्रश्नावर बोलण्याऐवजी आपल्या अंगणात काय जळतय ते पहायला हवे, असे केशव उपाध्यें यांनी म्हंटले आहे.