हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये आलबेल घडत असल्याचे भाजपमधील नेते सांगत आहेत. कँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा वापरत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानाबद्दल व पवारांनी काँग्रेसच्या नेत्यांना जाब विचारल्याच्या कारणावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. “एकाने मारायचं आणि दुसऱ्यानं समजवायचं असा सध्या राज्य सरकारमध्ये खेळ सुरू आहे,” असे त्यांनी टीका करताना म्हंटल आहे.
दिल्ली येथे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची राजकीय नीतिकार प्रशांत किशोर यांनी भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चाना उधाण आले आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषद घेत महत्वाची घोषणाच करीत काँग्रेस व राष्ट्रवादीला टोलाही लगावला. कोणत्याही पक्षासोबत निवडणूक लढून दाखवावा, मात्र, २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजप ४०० पेक्षा जास्त जागा जिकेलं, असे पाटील यांनी म्हंटले आहेत. तर राज्यातील राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये चाललेल्या घडामोडीबद्दल त्यांनी टीका केली.
ते म्हणाले कि, या राज्य सरकारमध्ये सध्या एकाने मारायचे आणि दुसर्याने समजवायचं असा खेळ सुरु आहे. हा जो काही राज्य सरकारचा खेळ सुरु आहे तो न कळण्याइतपत महाराष्ट्रातील जनता मूर्ख नाही. त्याची शिक्षा या सरकारला निवडणुकीत मिळणारच आहे. या महाविकास आघाडी सरकारच सध्या नाटक चालू आहे. त्या नाटकाला महाराष्ट्रातील जनता आता विटली आहे, असेही पाटील यांनी यावेळी म्हंटले आहे.