हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या नेत्या नयनाताई मनतकर यांचे पती अविनाश मनतकर यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपूरच्या अजनी भागात ही घटना गुरुवारी घडली. दरम्यान घटनेनंतर मनतकर यांच्या जवळ एक सुसाईड नोट पोलिसांना सापडली असून या सुसाईड नोटमध्ये मनतकर यांनी आपल्या आत्महत्येला भाजपचेच माजी आमदार चैनसुख संचेती यांना जबाबदार धरले आहे. या प्रकारामुळे नागपुरात एकच खळबळ उडाली आहे.
भाजप नेत्या नयनाताई मनतकर यांचे पती अविनाश मनतकर यांनी गुरुवारी दुपारी अजनी भागात रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. संचेती यांच्यामुळेच आपण आत्महत्या करत असल्याचं मनतकर यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. संचेती अध्यक्ष असलेल्या मलकापूर अर्बन बँकेच्या भ्रष्टाचारात अध्यक्ष संचेती आणि उपाध्यक्ष लखाणी यांनी फसवल्याचा आरोप सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे.
या सुसाईड नोटमध्ये रामदास पेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी किशोर शेळके यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आला आहे. शेळके यांनी आपल्याकडून 38 लाख रुपये उकळले आणि मदतही केली नाही, असा आरोप या सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे.