“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता तरी मातोश्री सोडा, अन्यथा…शेतकरी”; नवनीत राणांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टीचा चांगलाच फटका मराठवाड्याला बसला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीतील नुकसानीवरून आता विरोधकांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागले जात आहे. दरम्यान आज  खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. एकीकडे अतिवृष्टीमुळे मराठवाडा येथील शेतकऱयांचे आतोनात नुकसान झाले आहे तर अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र, आरामात मातोश्रीवर बसले आहे. आतातरी ठाकरेंनी मातोश्री सोडावे, अन्यथा शेतकरी मातोश्री वर पोहोचतील, असा इशारा राणा यांनी दिला आहे.

मराठवाड्यातील नुकसानीवरून व त्या ठिकाणी सरकारकडून देण्यात येणाऱ्या मदतीवरून  खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करीत मुख्यमंत्री ठाकरे यांना इशारा दिला आहे. आपल्या ट्विटमध्ये राणांनी म्हंटले आहे की, ” जर काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात असले तर आम्ही येणारी तुमची दिवाळी सुखात करु देणार नाही. मुख्यमंत्री ठाकरे तुम्ही जोपर्यंत बांधावर जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही सजमणार नाही. आज खर्या अर्थाने राज्याला तुमची गरज आहे. त्यामुळे मातोश्रीबाहेर पडून शेतीच्या नुकसानाची पाहणी करावी.

मराठवाड्यात सध्या पावसाने चांगलाच हाहाकार माजवला आहे. त्यामुळे येथील शेतकरी उद्धवस्त झाला आहे. विदर्भातही शेतकरी संकटात आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी विदर्भ, मराठवाडा दौरा करावा, शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी. मात्र, मुख्यमंत्री मातोश्रीबाहेर जात नाहीत, हे राज्याचे दुर्भाग्य आहे. दिवाळी पूर्वी मदत मिळाली नाही तर, शेतकरी मातोश्रीवर घुसतील, असा इशारा राणा यांनी दिला आहे.