हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज राज्याच्या विधानभवनात उमटले. या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळ परिसरात शिवसेना व भाजपच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे सुद्धा मारले. यामुळे पुन्हा एकदा राजकारण चांगलंच तापलं आहे.
सत्ताधाऱ्यांनी विधानभवनच्या पायऱ्यांवर बसून राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारत आंदोलन केले. तसेच राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली . या संपूर्ण प्रकारानंतर विरोधकांनी या घटनेचा निषेध केला. विधिमंडळाच्या आवारात अशी कृती करणे योग्य नाही. उद्या विरोधकही अशा पद्धतीने एखाद्या नेत्याविरोधात जोडे मारो आंदोलन करतील असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आंदोलन कर्त्यांना चांगलंच सुनावलं आहे.
दरम्यान, या एकूण सर्व प्रकारानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विअशा प्रकारचं कृत्य चुकीचे असल्याचे मान्य केलं. परंतु त्यांनी राहुल गांधींवर टीका करण्याची संधी यावेळी सोडली नाही. विरोधकांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात असे वक्तव्य करण्याची हीन प्रवृत्ती बंद केली पाहीजे. सावरकरांनी अंदमानात 11 वर्षे तुरुंगवास भोगला असून राहुल गांधींनी त्यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे, असे फडणवीस म्हणाले