हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर ते अद्याप समोर आलेले नाहीत. दरम्यान काल पार पडलेल्या बैठकीवेळी त्यांनी गैरहजेरी लावल्याने यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला. मुख्यमंत्री बरे होण्यापर्यंत आदित्य ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा चार्ज द्या, असे म्हणत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनाकानपिचक्या दिल्या.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये जोरदार टीका-टिप्पणी सुरु आहे. दरम्यान काळ झालेल्या बैठकीवेळी मुख्यमंत्र्यानी गैरहजेरी लावल्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की,
आरोग्याच्या कारणावरुन राज्यावर अन्याय करु नका. 45 दिवसांपासून राज्यातील जनतेनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाहिलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी लवकर बरं व्हावं. पण तोपर्यंत त्यांनी कुणाकडे तरी चार्ज द्यावा. तीन पक्षांचं सरकार आहे. हवं तर तिघांचं मिळून एक मंडळ तयार करा. आदित्य ठाकरे यांच्याकडे चार्ज द्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत पाटील म्हणाले की, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झालं त्यावेळी त्यांचे अंतिम संस्कार शासकीय इतमामात करण्याची फाईल 5 तास पडून होती. असा व्यक्तींवर ही वेळ येत असेल तर इतरांचं काय. त्यामुळे महाराष्ट्राला रामभरोसे ठेवता येणार नाही, असे पाटील यांनी म्हंटले.
मुख्यमंत्र्यांचा आदित्य ठाकरेंवरही विश्वास नाही : चंद्रकांत पाटील
दरम्यान आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अधिवेशनापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्री आजारी असल्यानं गैरहजर असणं स्वाभाविक आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी चार्ज दुसऱ्याकडे द्यायला हवा.काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून चार्ज परत मिळणार नाही, अशी शक्यता असल्यानं किमान तो आदित्य ठाकरेंकडे तरी चार्ज द्यावा. मात्र, मुख्यमंत्री ठाकरेंचा त्याचे पुत्र आदित्य ठाकरेंवरही विश्वास नाही वाटतं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.