हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात काँग्रेस – राष्ट्रवादीच्या साथीने सत्तेत बसलेल्या शिवसेनेवर हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी कुणाचा भगवा शुद्ध यावरून देखील या दोन्ही पक्षांमध्ये चांगलाच वातावरण तापलेलं पाहायला मिळालं होतं.अशातच, शिवसेनेकडून औरंगाबादचा कायमच संभाजीनगर असा उल्लेख केला जातो. गेली कित्येक वर्षे औरंगाबादच संभाजीनगर नामकरण करण्यासाठी राजकारण सुरु असलेलं पाहायला मिळत आहे. मात्र, शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसने नामकरणाला विरोध केला आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे.
अशातच, शिवसेनेच्या उर्दू भाषेतील दिनदर्शिकेचा फोटो सद्या व्हायरल होत आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट म्हणून ओळखलं जातं. मात्र, या दिनदर्शिकेत त्यांचा उल्लेख ‘जनाब’ असा केला असल्याचे दिसून येत आहे. यानंतर, भाजप नेत्यांनी यावरून शिवसेनेवर घणाघात केला आहे.
भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी देखील हल्लाबोल केला आहे. ‘औरंगाबादचे संभाजीनगर करणे झेपले नाही, उस्मानाबादचे धाराशिव करणे जमले नाही… परंतु ‘हिंदुहृदयसम्राट’चे ‘जनाब’ बाळासाहेब ठाकरे असे नामकरण मात्र यशस्वीपणे केले… कात टाकणाऱ्या शिवसेनेचे मनापासून अभिनंदन…’ अशी जहरी टीका भातखळकर यांनी केली आहे.
औरंगाबादचे संभाजीनगर करणे झेपले नाही, उस्मानाबादचे धाराशिव करणे जमले नाही…
परंतु 'हिंदुहृदयसम्राट'चे
'जनाब' बाळासाहेब ठाकरे असे नामकरण मात्र यशस्वीपणे केले…कात टाकणाऱ्या शिवसेनेचे मनापासून अभिनंदन… @OfficeofUT
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 31, 2020
भाजपाचे नेते अतुल भातखळकर कायमच आपल्या तिखट शब्दांतील माऱ्यासाठी ओळखले जातात. शिवसेनेवर टीका करण्याची संधी ते कधीही सोडत नाहीत. आता त्यांच्या या टीकेला शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर येतेय हे पाहणे महत्त्वाचे आहे.