मुंबई प्रतिनिधी : राज्यात निवडणुकांचे निकाल लागून तीन आठवडे उलटले तरी सत्तेसाठीचा दावा कोणत्याही पक्षाने केलेला नाही आहे. दरम्यान निवडणूक निकालाप्रमाणे सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी भाजपाला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केले होते मात्र भाजप असमर्थ ठरले. त्यामुळे आता शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी आमंत्रित केलं आहे. मात्र महत्वाची बाबा म्हणजे आता सत्तास्थापनेसाठी दिलेल्या अवधीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
“राज्यपालांनी भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी ७२ तासांची मुदत दिली होती. मात्र आम्हाला फक्त २४ तासांची मुदत दिली. यावरुन समजून घेतलं पाहिजे. असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला. बहुमत मिळवण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे राज्याला राष्ट्रपती राजवटीमध्ये ढकलण्यासाठी प्रयत्न होत आहेत,” अशी टीका संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेवेळी केली.
“काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाला माझे आवाहन आहे की, महाराष्ट्रात सगळ्यांनी मिळून एकत्र येत स्थिर सरकार द्यावे असेही संजय राऊत यांनी व्यक्त केले. भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही, हे त्यांचे दुर्देव आहे. भाजपच्या द्वेष आणि अहंकारामुळे महाराष्ट्रात ही वेळ आली आहे. अशी टीका संजय राऊत पत्रकार परिषदेदरम्यान केली.”
“भाजपने राज्यपालांना जाऊन शिवसेना आमच्यासोबत येत नाही असे सांगितले. पण त्यांनी याबाबत एकदा तरी आम्हाला विचारले का? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला. भाजपच्या प्रमुख नेत्यांनी शिवसेनेवर खापर फोडणं चुकीचे आहे. त्यांनी जर आमच्या अटी मान्य केल्या असत्या, तर आम्ही सोबत राहिलो असतो अशी खोचक टीकाही संजय राऊत यांनी यावेळी केली.”
तसेच शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना ते म्हणाले, “आम्ही केंद्रीय मंत्रिमंडळातून मंत्री राजीनामा देत आहोत. त्याचा तुम्हाला जो अर्थ काढायचा तो काढा.”“भाजप विरोधात बसायला तयार आहे. मात्र शिवसेनेला सत्ता द्यायला तयार नाही हे एक मोठे षडयंत्र आहे. महाराष्ट्र राज्य आमचे आहे. या राज्यात कुठलीही अस्थिरता येता कामा नये. राष्ट्रपती राजवटीच्या नावाखाला कोणीही सत्ता आपल्या ताब्यात घेऊ पाहत असेल, तर त्याला तिन्ही पक्षांचा विरोध राहिलं, असेही ते म्हणाले.”
“राज्यपालांनी शिवसेनेला सरकार बनवण्याबाबत विचारलं आहे. त्या दिशेने आम्ही पावलं टाकतं आहे. त्यामुळे माझं दोन्ही पक्षांना आवाहन आहे की, राज्याच्या राजकारणात एकत्रित येऊ आणि राज्याला स्थिर सरकार देऊ. राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल. सध्या सत्तास्थापनेबात आमची बोलणी सुरु आहे. त्यानंतरच अधिकृत भूमिका माडणार असेही संजय राऊत म्हणाले.”