Tuesday, February 7, 2023

कोरोना केंद्राबाहेर लावलेल्या फोटोवरून भाजपचा ‘हा’ नेता आक्रमक ; रोहित पवारांवर केली टीका

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : वाढत्या कोरोनाबरोबर आता भाजप व राष्ट्रवादीमध्ये एकमेकांवर टीकाही करण्याचे प्रमाण वाढत आहे. भाजपमधील अनेक नेते राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका करीत आहेत. अशीच खरमरीत टीका भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर त्यांचे नाव न घेता केली आहे. ग्रामीण रुग्णालय आणि केंद्र व राज्य सरकारच्या मदतीवर चालणाऱ्या डॉ. आरोळे कोविड केअर सेंटरच्या बाहेर एकट्या आमदाराचे फोटो कसे?’ असा प्रश्नही उपस्थित करत प्रा. राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, बारामतीच्या तुलनेत जामखेडकडे कमी लक्ष दिले जात असल्याने अगोदरच भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे आक्रमक झाले आहेत. त्यांनी कर्जत-जामखेडमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच याबाबत माध्यमप्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. यावेळी शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. कोरोनाच्या उपचारासाठी रेमडीसीव्हर इंजेक्शन आवश्यक आहे. ते इंजेक्शन बारामतीला मिळते. मात्र, जामखेडला का मिळत नाही? असा प्रश्न शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला.

- Advertisement -

जामखेडला इंजेक्शन मिळाले नसल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याला सर्वस्वी राज्य सरकार व स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. मात्र, त्यांच्याकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासनातही याबाबत ताळमेळ असल्याचे दिसत नसल्याचे प्रा. शिंदे यांनी सांगितले. तसेच जामखेडच्या आरोळे प्रकल्पातील असलेल्या कोरोना केअर सेंटरची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.

या सेंटरच्या बाहेर स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपला स्वत:चा फोटो असलेला फ्लेक्स या सेंटरबाहेर लावला आहे. या सेंटरला जर सरकारची मदत मिळत असेल तर तेथे पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेही फोटो हवे होते. स्वत:चा फोटो लावायचा होता तर जामखेडला स्वखर्चाने कोविड केअर सेंटर उभे करायचे होते,’ असा टोलाही प्रा. राम शिंदे यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता लगावला.