औरंगाबाद – महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपतर्फे पाण्याचा मुद्दा हाती घेण्यात आला आहे. याच संदर्भात शहरात भाजपतर्फे सातत्याने आंदोलन करण्यात येत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शहरवासीयांच्या पाण्यासाठी आपण 1680 कोटींची पाणी योजना मंजूर केली होती. पण या नाकर्त्या सरकारने ती बदलल्याचा आरोप केले. आता फडणवीसांच्या नेतृत्वाखाली 20 मे पूर्वी महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी दिली.
केणेकर म्हणाले की, या मोर्चात 50 हजार लोक सहभागी होईल अशी तयारी सुरु केली आहे. गेल्या महिनाभरात पाण्यासाठी भाजपने दोनदा आक्रमक होत आंदोलन केले. आमदार अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका प्रशासकांच्या बंगल्यावर मोर्चा काढला, सिडकोतील पाण्याच्या टाकीसमोर आंदोलन केले. दोन दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलनात भाजपने मनसेलाही सोबत घेतले होते. 6 दिवसांना पाणी पुरवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेतल्याचेही केणेकर यांनी सांगितले.
महापालिकेत 25 वर्ष शिवसेनेसोबत सत्ता उपभोगल्यानंतरही भाजप शहराच्या पाणी प्रश्नासाठी एकट्या शिवसेनेला दोष देत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. महाविकास आघाडी सरकारने योजना बदलल्यानंतर ज्या कासवगतीने काम सुरू आहे, ते पाहता आणखी वर्षभर तरी औरंगाबादकरांना पाणी मिळण्याची शक्यता नाही. यावरून आता भाजपनेही शिवसेनेला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न या मोर्चाच्या निमित्ताने चालविला आहे.