सांगली | आज देशातील राजकारण एका वेगळ्या दिशेला जात आहे. राज्य एका वेगळ्या विचाराच्या लोकांच्या हातामध्ये आहे. महाराष्ट्रात अनेक कर्तृत्ववान लोकांची नावे घ्यावी लागतील, त्यांचा हा महाराष्ट्र आहे. त्यांनी स्वातंत्र्यासाठी कष्ट घेतले, देश स्वतंत्र केला. त्यानंतर स्वातंत्र्यानंतर लोकांच्या जीवनामध्ये एक प्रकारचे चांगले दिवस येतील. यासाठी अनेक गोष्टी केल्या. त्यांनी विकासाचे राजकारण केले, माणसं जोडण्याचे राजकारण केलं. परंतु आज धर्माच्या नावाने देशांमध्ये लोकांच्यात अंतर निर्माण करण्याचे काम केले जाते. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद या लोकांनी स्वातंत्र्यासाठी मोठे कष्ट घेतले आणि त्यानंतर देश उभा करण्यासाठी प्रचंड योगदान दिले. देशासाठी ज्यांनी आपले सर्वस्व दिले, त्यांचा आदर, सन्मान हे ठेवण्याच्या ऐवजी त्यांच्यावर ती टीका करण्यात धन्यता मानणारे नेतृत्व आज दुर्दैवाने देशांमध्ये बघायला मिळते, अशी टीका राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांनी केली आहे.
शिराळा (जि. सांगली) येथे माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. श्रीनिवास पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आ. मानसिंगराव नाईक, जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, आज लोकांच्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे. सध्याचे दोन वर्षे सोडली असता, गेल्या पाच वर्षात असलेले महाराष्ट्रातील सरकार वेगळ्या विचाराचे होत. याआधी कधीही महाराष्ट्राने असे पाहिले नव्हते. कर्नाटक राज्यात भाजपाची सत्ता आहे, तिथे अल्पसंख्यांक व्यवसायाकडून मालाची खरेदी करू नये, असा फतवा काही संघटनांनी काढला. त्यामुळे सामाजिक व धार्मिक ऐक्य कसे ठेवायचे असा प्रश्न आपल्यापुढे आहे. धर्मांध प्रवृत्तीच्या विरोधात एक प्रकारची लढाई आपल्याला करायची आहे. आपण राजकारण करायचं ते समाजाच्या हिताच, समाजाच्या विकासाचाच करायचं आहे.
राज्यात जूनच्या पहिल्या आठवड्यातही साखर कारखाने चालू राहतील
राज्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 90 टक्केपेक्षा अधिक कारखाने चालू राहतील. शेतात सध्या सर्वत्र उसाचे पीक दोन पैसे मिळणारे म्हणून घेतले जात आहे. अनेक देशात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करून ते वापरले जात आहे. त्यामुळे काही दिवसांनी इथेनॉल ही विकत घ्यावे लागणार आहे. केवळ साखर निर्मिती करून समाधान मानावे असे नाही. त्याबरोबर अन्य पदार्थ निर्मिती करणे गरजेचे आहे. साखर तयार झाल्यानंतर वर्षभर गोदाममध्ये ठेवावी लागते. त्या साखरेवर कर्ज घेतले जाते, त्यामुळे कर्जाचे व्याज द्यावे लागत असल्याने त्याच्या किमतीचा भार शेतकऱ्यांवर पडतो. त्यामुळे अन्य पदार्थ निर्मिती उसापासून केली जात असल्यामुळे आनंद होत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले