हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एसटी बसने (ST Bus) प्रवास करणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. इथून पुढे एसटी बसचे तिकीट आता इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या वेबसाइटवरून म्हणजेच IRCTC द्वारेही बुक करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे काम सोप्प होणार आहे. या सुविधेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत करार पार पडला आहे.
महाराष्ट्रातील अनेक प्रवासी रेल्वे सोबतच राज्यातील स्थानिक बस सेवेचा वापर करतात. या दोन्ही सेवेचा एकत्रित वापर प्रवास्यांना करता यावा या उद्देशाने महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन म्हणजेच MSRTC ने IRCTC सोबत हा करार केला आहे. खरं तर MSRTC चे देखील प्रवाशी बुकिंग साठीचे स्वतःचे अँप आहे. परंतु त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात नाही. तसेच कधी कधी वापर करताना अनेक अडचणी देखील येतात. या बाबी लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने IRCTC सोबत हा करार केला आहे.
या करारानंतर IRCTC च्या CMD सीमा कुमार म्हणाल्या की, “आयआरसीटीसी आणि एमएसआरटीसी यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी हा प्रवाशांना एकाच ठिकाणाहून त्यांची प्रवास व्यवस्था सुलभ करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे प्रवाशांना IRCTC बस बुकिंग पोर्टलद्वारे चांगल्या कनेक्टिव्हिटीचा लाभ मिळेल, आणि प्रवाशांचा प्रवास सुरळीत होण्यास मदत होईल.
अशा प्रकारे बुक करा बसचे तिकीट
आता प्रवासी https://www.bus.irctc.co.in चा वापर करून बसचे देखील बुकिंग करू शकता. IRCTC च्या माध्यमातून तुम्ही कॅटरिंगच्या सुविधेचा देखील लाभ घेऊ शकता. त्यामुळे एकाच अँप च्या माध्यमातून प्रवासासाठी आवश्यक सर्व गोष्टी एकाच माध्यमातून मिळतील.