हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यापासून राज्यात अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. या दोन्ही गटांकडून राष्ट्रवादी पक्षावर आणि पक्षाच्या चिन्हावर दावा करण्यात येत आहे. सध्या याच प्रकरणावर केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अजित पवार गटाने आणि शरद पवार गटाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका न लढण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
सध्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींची राजकीय वर्तुळात जोरदार तयारी सुरू झाली आहे. मुख्य म्हणजे, या निवडणुकांसाठी अजित पवार गट आणि शरद पवार गट देखील कामाला लागले आहेत. मात्र निवडणूक चिन्हावरून या दोन्ही गटात लढाई सुरू झाली आहे. हे दोन्ही गट पक्षाच्या चिन्हावर अधिकार दाखवत आहेत. त्यामुळे याची सुनावणी केंद्रिय निवडणूक आयोग करणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील वृत्त सकाळने दिले आहे.
दरम्यान, निवडणूक चिन्हाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाच्या वर्किंग कमिटीची दिल्ली येथे बैठक पार पडणार आहे. मात्र अजून या बैठकीची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. मुख्य म्हणजे, या दोन्ही गटांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असला तरी पुढे जाऊन या निर्णयात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, अद्याप दोन्ही गटांकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाबाबत कोणत्याही प्रमुख नेत्यांकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.