चिनी उत्पादनांवर बंदी घालण्यापेक्षा, स्वयंपूर्ण होण्यावर भर द्या!- पी.चिदंबरम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । गलवान खोऱ्यात चिनी सैन्याच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर देशभरात चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे सध्या देशात चिनी उत्पादनांवर बंदी घालण्याच्या मोहीमेने जोर पकडला आहे. सरकार आणि व्यापारी संघटनांनी बाजारपेठेतून चीनची उत्पादने हद्दपार करण्यासाठी पद्धतशीर पावले उचलायला सुरुवात केली आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर केंद्र सरकारकडून चीनची आर्थिक कोंडी करणारी पावले उचलण्यात आली होती. भारतातील अनेक चिनी कंपन्यांची कंत्राटे आणि करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपन्यांना चिनी उपकरणे न वापरण्याचे निर्देश देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.

पी. चिदंबरम यांनी म्हटले की, ”चीनचा भारताशी होणारा व्यापार हा त्यांच्या जागतिक स्तरावरील व्यापारी उलाढालीच्या तुलनेत अगदी नगण्य आहे. त्यामुळं भारतीय बाजारपेठेत चिनी उत्पादनांवर बंदी घातली तरी चीनच्या अर्थव्यवस्थेला काडीचाही फरक पडणार नाही. त्याऐवजी भारताने स्वयंपूर्ण होण्यावर भर दिला पाहिजे. मात्र, याचा अर्थ उर्वरित जगाशी व्यापारी संबंध तोडावेत, असा होत नाही. भारताने चिनी उत्पादनांवर बंदी न घालता जागतिक पुरवठा साखळीतील आपले स्थान कायम ठेवले पाहिजे. देशाच्या संरक्षणासारखा संवेदनशील विषय हाताळताना आपण उत्पादनांवर बंदी आणण्याचा मुद्दा विचारात घेता कामा नये, असे मत पी. चिदंबरम यांनी मांडले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”