टोकियो : वृत्तसंस्था – जपान पोलिसांनी एकाच वेळी ३५ महिलांना डेट करणाऱ्या मजनूला अटक केली आहे. या मजनूने आपली जन्मतारीख वेगवेगळी सांगण्याची शक्कल लढवत ३५ महिलांना आपल्या जाळ्यात ओढले होते. पोलिसांनी त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या व्यक्तीकडे राहण्यासाठी स्वतःचे घरसुद्धा नाही.
ताकाशी मियागावा असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सध्या तो कंसाई भागात राहतो व पार्ट टाइम नोकरी करतो. हा मजनू एकाचवेळी ३५ महिलांना डेट करत होता. तसेच त्यांनी या ३५ जणांना आपली वेगवेगळी जन्मतारीख सांगितली होती. पोलिसांनी या व्यक्तीवर ३५ महिलांची फसवणूक करणे आणि त्यांच्यासोबत नात्यांबाबत गंभीर होण्याचे नाटक करणे असे आरोप लावले आहेत.आरोपी ताकाशी मियागावाची खरी जन्मतारीख १३ नोव्हेंबर हि आहे. त्याने त्याच्या ४७ वर्षीय प्रेयसीला जन्मदिवस २२ फेब्रवारी असल्याचे सांगितले. तर, ४० वर्षीय प्रेयसीला २२ जानेवारी ही जन्मतारीख सांगितली. तर, ३५ वर्षीय प्रेयसीला एप्रिल महिन्यात वाढदिवस असल्याचे सांगितले. याप्रमाणे त्याने एकूण ३५ महिलांची फसवणूक केली आहे.
महिलांकडून घेतल्या महागड्या भेटवस्तू
फसवणूक केलेल्या महिलांकडून आरोपी मियागावाने महागड्या भेट वस्तू घेतल्या आहेत. या भेटवस्तूंमध्ये कपडे, रोख रक्कम, भेट वस्तू या गोष्टींचा समावेश आहे. मियागावा हा हायड्रोजन वॉटर शॉवर हेड आणि अन्य उत्पादनांची विक्री करणाऱ्या एका मार्केटिंग कंपनी काम करताना त्याची या महिलांसोबत ओळख झाली होती. आरोपी हा सेल्समनचे काम करत होता त्यामुळे तो घरोघरी जाऊन आपले सावज हेरत होता. हा आरोपी एकट्या महिलांना जास्त करून लक्ष करत असे. त्यांच्यासोबत चांगले संबंध निर्माण झाल्यावर तो त्यांना लग्नाचे आश्वासन देत असे. लग्नाच्या आश्वासन देऊन हा आरोपी या महिलांकडून महागड्या भेटवस्तू आणि पैसे लुटत असे. अखेर या सगळ्या महिलांनी एकत्र येऊन त्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी या मजनूच शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.