हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे एअरपोर्ट ऑथेरिटीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची आठवण करून देणारे ट्विट केले. त्यांच्या ट्विटनंतर ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी डॉ. कोल्हे यांच्यावर निशाणा साधला आहे. “कोल्हेंना नेमकं दु:ख कशाचं आहे? शिवाजी महाराजांची प्रतिमा नसण्याचं की पेशव्यांची असण्याचं? असा सवाल दवे यांनी केली आहे.
आनंद दवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी डॉ. अमोल कोल्हे
यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, अमोल कोल्हे यांना दुःख कशाचं आहे? शिवाजी महाराजांच्या प्रतिमा नसण्याचं की पेशव्यांची असण्याचं? पुणे विमानतळावर पेशव्यांचा उल्लेख असण्याने कोल्हेकुई सुरु झाली आहे. केवळ विमानतळवरच नाही तर संपूर्ण पुणे शहरांत छत्रपतींच्या प्रतिमा, पुतळे असावेत ही आमची आधी पासूनचीच भूमिका आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या नावाने राजकारण करणारे, सर्वत्र त्यांचाच उल्लेख करणाऱ्या नेत्यांनाच महाराजांचा विसर पडला आहे हे आम्हाला जाणवत आहे.
एवढी वर्ष केंद्रात सत्तेवर असून अगदी नागरी उड्डाण मंत्रिपद असून सुद्धा प्रफुल्ल पटेल यांनी या विमानतळासाठी हवे तसे प्रयत्न का केले नाहीत? आता सुद्धा त्यासाठी कोल्हे यांनी प्रयत्न करावे. पुणे शहरातील पेशव्यांचे हे एकमात्र शिल्प असताना ते कोल्हे यांच्या पोटात का दुखतं हे आम्हाला कळत नाही? असा टोलाही यावेळी ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना लगावला आहे.