महाअधिवेशनात राज ठाकरेंचा फुसका बार; माध्यमांतील फुटेज खात, जुन्याच गोष्टी सांगत केली ‘महानिराशा’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २३ जानेवारी २०२० बाळासाहेब ठाकरे यांची ९४ वी जयंती. याच दिवशी महाराष्ट्रातील दोन मोठ्या नेत्यांनी शक्तिप्रदर्शनाची तयारी करत माध्यमांची फुटेज सकाळपासूनच खायला सुरुवात केली होती. एक होते अपघाताने राज्याचे मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे आणि दुसरीकडे मुख्यमंत्रीपदाचं स्वप्नरंजन करत धुव्वाधार भाषणं देणारे राज ठाकरे. यात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने झेंडा बदलणे, महाअधिवेशन घेणे, अमित ठाकरे यांना सक्रिय राजकारणात उतरवणे आणि विधानसभा निवडणुकीनंतर आपली काय भूमिका आहे ते मांडणे हे सांगण्यासाठी मजबूत खटाटोप केला. मात्र २३ तारखेची संध्याकाळ ही तमाम हिंदू बांधवानो आणि भगिनींनो म्हणत सुरु झाली आली आणि घुसखोर मुस्लिमांना धडा शिकवला पाहिजे म्हणत संपली. या सभेत कोणतेही विशेष मुद्दे महाराष्ट्रातील लोकांना ऐकायला मिळाले नाहीत.

नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा द्यायचा हे एखाद्या प्रादेशिक पक्षाचं एकमेव उद्देश कसं काय असू शकतं हा प्रश्न राज ठाकरेंचं भाषण संपल्यानंतर बऱ्याच जणांना पडला असेल. भगवा झेंडा, शिवाजी महाराज, मराठीपण, हिंदुत्व, मोर्चाला उत्तर मोर्चानेच द्यायला हवं ही घिसीपिटी संकल्पना सांगत राज ठाकरे टाळ्या आणि शिट्ट्या घेत राहिले. मात्र महाराष्ट्राला सध्या कशाची आवश्यकता आहे याबाबत काहीही न बोलताच त्यांनी आपला कार्यक्रम उरकता घेतला . चांगलं काम करणाऱ्या २-४ मुस्लिमांचं नाव घेऊन राज ठाकरे यांना काय म्हणायचं होतं हे त्यांनाच माहित. मशिदीवरील भोंगे थांबले पाहिजेत, घुसखोरांना जागा दाखवली पाहिजे हा घोष त्यांनी चालूच ठेवला.

सत्ताधाऱ्यांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेटची स्थापना हाच काय तो वेगळा प्रयोग महाअधिवेशनाच्या निमित्ताने ऐकायला मिळाला. राज ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच सोशल मीडियावर माझ्या पक्षाचा प्रतिनिधी कोणत्याही वाईट प्रकारची पोस्ट टाकणार नाही असा ठराव बोलून दाखवला. पण काही प्रसिद्ध पक्षांच्या आयटी सेलचे लोक आक्षेपार्ह भाषेत बोलतच असतील तर त्यांना आवरण्यासाठी मनसेचा महाराष्ट्र सैनिक काय करणार हे सांगायला मात्र राज ठाकरे विसरले. २३ जानेवारीच्या सकाळीच राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचं राजकीय लॉन्चिंग मोठ्या झोक्यात करण्यात आलं. त्यांनी लगेच शिक्षणविषयक ठरावही मांडला. मात्र दप्तराचं ओझं कमी करण्याइतकाच महाराष्ट्राच्या शिक्षणाचा प्रश्न मर्यादित आहे का? याचं उत्तर अमित ठाकरेंना स्वतःला जरी देता आलं तरी भरपूर झालं. एकूण काय महाअधिवेशनातील राज ठाकरेंचा बार हा महानिराशा करणारा निघाला.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

‘मी झेंड्याचा रंग बदलला, रंग बदलून सरकारमध्ये गेलो नाही!’; राज ठाकरेंनी लगावला शिवसेनेला टोला

मी आजही मराठी आणि हिंदूच मात्र, प्रत्येकाने आपला धर्म घरातच पाळावा – राज ठाकरे

मी आजही मराठी आणि हिंदूच मात्र, प्रत्येकाने आपला धर्म घरातच पाळावा – राज ठाकरे