मुंबई प्रतिनिधी सत्ताधारी आणि विरोधकांची महापूराच्या मुद्दयांवरून चांगलीच जंग जुंपाण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाच धारेवर धरले आहे. अमित शहा यांची सासुरवाडी कोल्हापूर आहे याची त्यांनी जाणीव ठेवून तरी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करावी. फक्त हवाई पहाणी करून काहीच होणार नाही असा खोचक टोला बाळासाहेब थोरात यांनी अमित शहा यांना लगावला आहे. मागील काही दिवसापूर्वी अमित शहा यांनी कोल्हापूर आणि सांगली भागाची हवाई पहाणी केली होती.
आज मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसची याविषयीबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी हवाई पाहणी करण्यापेक्षा अलमट्टी धरणातून पाणी सोडले असते तर जी पूरस्थिती निर्माण झाली ती स्थिती टाळता आली असती असे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. पुराचे पाणी जरी ओसरत असले तरी त्यानंतर उदभवणारी परिस्थिती अत्यंत बिकट आहे. प्रशासन अशा गंभीर परिस्थितीत देखील कासव गतीने काम करत आहे. त्यामुळे येथील लोक प्रशासनावर नाराज आहेत असे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
सरकारने दिलेल्या पाच हजारांच्या मदतीने काय होणार नाही. येथील लोकांच्या पुनर्वसनाच्या कामासाठी तात्काळ पाऊले उचलली पाहिजेत. त्याच प्रमाणे केंद्राकडून या प्रश्नी तातडीची आणि भरीव मदत मिळाली पाहिजे. तसेच इचलकरंजी येथील कापड उद्द्योगाला देखील आर्थिक पाटबळ दिले गेले पाहिजे असे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. सरकार पूर परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरले आहे हे सरकारने देखील कबूल केले पाहिजे असे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.