सचिन अहिरांच्या शिवसेना प्रवेशावर जितेंद्र आव्हाड म्हणतात

मुंबई प्रतिनिधी |  सत्ता हेच सर्वस्व असेल तर स्वामीनिष्ठा नावाचा काही प्रकार असतो हे देखील त्यांनी लक्षात घ्यावे. माझ्या हृदयात शरद पवार आहेत असे म्हणणारे शरद पवार यांच्या ८० वर्षाच्या वयात त्यांना सोडून दुसऱ्या पक्षात जात असतील तर त्यांच्या हृदयाला किती वेदना होत असतील अशी भावनिक प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशावर दिली आहे.

गांधींच्या नावावर मते मागणारे आता नथुरामच्या टोळीत जाऊन सामील झाले आहेत. त्या गांधीला सुद्धा वरून यांच्याकडे बघून शरम वाटली असेल. गांधीला सुद्धा वाटले असेल उगाच यांच्यासाठी गोळ्या खाल्ल्या असे जितेंद्र आव्हाड सचिन अहिर यांना म्हणाले आहेत.

मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना वरळीमधून विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच सचिन अहिर हे उद्योगपती असल्याने शिवसेनेला चांगली रसद देखील पुरवली जाईल याची शक्यता नाकारता येणार नाही.