सांगली । मोठ्या बहिणीकडे भाऊबीजेच्या ओवाळणीसाठी गेलेल्या बहिण-भावाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. जत ते पंढरपूर मार्गावर दरीकुणूर गावाजवळ दुचाकी आणि क्रुझरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला. अक्षय श्रीमंत चौगुले आणि काजल श्रीमंत चौगुले अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे दुचाकीवरून पंढरपूर तालुक्यातील पळे येथील मोठ्या बहिणीकडे भाऊबीजेसाठी गेले होते. गावाकडे परत येताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला.
अक्षय चौगुले हा त्याच्या लहान बहिणीला सोबत घेऊन दुचाकीवरून भाऊबीजेच्या ओवाळणीसाठी मोठ्या बहिणीकडे गेला होता. पंढरपूर तालुक्यातील पळे येथे मोठ्या बहिणीच्या घरी भाऊबीजेची ओवाळणी झाल्यानंतर अक्षय आणि काजल हे दोघे आज दुपारी गावाकडे परत येत होते. पंढरपूर ते जत मार्गावर दरीकोणूर गावाजवळ समोरून आलेल्या क्रुझरला दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात अक्षय आणि काजलचा जागीच मृत्यू झाला. दरीबडची गावापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर झालेल्या अपघातात बहिण-भावाचा दुर्दैवी अंत झाला.
या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील क्रुझर कर्नाटकातील असून ती काही भाविकांसह दाणम्मा देवीच्या दर्शनासाठी निघाली होती. पोलिसांनी क्रुझर चालकाला ताब्यात घेतले आहे. अपघातातील दुचाकीचालक अक्षय चौगुले याचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते, तर त्याची लहान बहीण काजल ही दहावीच्या वर्गात शिकत होती. भाऊबीजेच्या दिवशीच बहिण-भावाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, जत तालुक्यात गेल्या तीन दिवसात अपघातांमध्ये चौघांचा मृत्यू झाल्याने रस्त्यांवरील प्रवास धोकादायक बनला आहे.