सांगली | बैलगाडा शर्यतीसाठी बंदी असतानाही भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यत पार पाडून दाखवली आहे. आटपाडी तालुक्यातील निंबवडे- वाक्षेवाडी गावांच्या दरम्यान असलेल्या पठारावर पहाटे शर्यती झाल्या असल्याचं सांगण्यात येत आहे. शर्यत संपन्न झाल्याचं सांगताच पडळकर समर्थकांनी एकच जल्लोष केला. पोलिसांच्या चोख बंदोबस्ताला चुकवून गनिमी काव्याने आंदोलन संपन्न झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. पाच बैलजोड्यांचा सहभाग असलेल्या स्पर्धेत सागर- सुंदरने शर्यतीचं मैदान मारुन 1 लाख 11 हजार रुपयांचं बक्षीस पटकावलं.
आटपाडी तालुक्यातील झरे या गावी बैलगाडा शर्यत होणार असल्याचं सांगत गोपीचंद पडळकरांनी सरकारला आव्हान दिलं होतं. ही शर्यत होऊ नये म्हणून पोलिस प्रशासन सज्ज झाले होती. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होऊ नये म्हणून पोलिसांनी कटेकोट बंदोबस्त तैनात केला होता. शर्यत स्थळावरही पोलिस उपस्थित होते. मात्र, पोलिसांना चकवा देत पडळकरांनी रातोरात दुसऱ्या जागेवर मैदान तयार करत शर्यत भरवली आहे. गोपीचंद पडळकरांनी पोलिसांना चकवा देत एका रात्रीत पाच किलोमीटरचा दुसरा ट्रॅक बनवून बैलगाडा शर्यती पार पडल्या. झरे गावात बैलगाडा शर्यत पार पडणार होती. मात्र पोलिसांनी गावच्या मुख्य मैदानाची धावपट्टीच उखडून टाकली होती.
बैलगाडी शर्यत झालीच : गोपीचंद पडळकरांचा पोलिसांना चकवा, सागर-सुंदर जोडीने मैदान मारत पटकाविले 1 लाख 11 हजारांचे बक्षीस pic.twitter.com/HYE6GvICfQ
— Vishal Vaman Patil (@VishalVamanPat1) August 20, 2021
त्यानंतर मात्र पडळकर समर्थकांनी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास तिथूनच पाच किमी अंतरावर दुसऱ्या एका मैदानात धावपट्टी तयार केली आणि पुढच्या काही तासांत तिथे स्पर्धा भरवली. या शर्यतीत पाच ते सहा बैलगाडा चालक आणि मालक सहभागी झाले होते. तसंच ही स्पर्धा पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. यानिमित्ताने पडळकर समर्थकांनी पोलिस आणि प्रशासनाला मोठा गुंगारा दिल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांना गाफील ठेऊन ही शर्यत पार पडली. स्पर्धेत सागर सुंदरने शर्यतीचं मैदान मारुन 1 लाख 11 हजार रुपयांचं बक्षीस पटकावलं.