नवी दिल्ली | तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल किंवा जास्त उत्पादनासाठी प्रगत मशीन्स घ्यायच्या असेल किंवा नवीन युनिट सुरू करण्यासाठी जास्त मनुष्यबळाची गरज असेल. या सर्व कामांसाठी आपल्याला आणखी पैशांची गरज असेल तर अशा आर्थिक गरजा आपण बिझनेस लोन घेऊन पूर्ण करू शकतो.
हे स्पर्धेचे युग आहे आणि व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आपल्याला सतत आपल्या संसाधनांमध्ये नवनवीन शोध घेणे आवश्यक आहे. प्रगत तंत्रज्ञानाच्या बळावरच आपण व्यावसायिक जगात सुरू असलेल्या स्पर्धेत मात करू शकतो.
व्यवसाय चालवण्यासाठी यंत्राप्रमाणे इंधनही लागते आणि पैसा हे व्यवसायाचे इंधन आहे. बिझनेस वाढवायचा असो किंवा नवीन युनिट सुरू करायचा असो, सगळ्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात पैसा लागतो.काहीवेळा आपल्याकडे व्यवसायातील पैशांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आपले वैयक्तिक सोर्स असू शकतात. मात्र जर आपल्याकडे स्वतःची संसाधने नसतील किंवा संसाधने संपली असतील तर नेहमी बँक किंवा नॉन बँकिंग फायनान्स कंपनी- NBFC कडून बिझनेस लोन घेण्याचा पर्याय असतो.
बिझनेस लोन हे असुरक्षित कर्जाचा (unsecured loan) प्रकार आहे. कर्जदाराच्या पतपात्रतेच्या आधारावर व्यवसाय कर्ज दिले जाते. अनेक बँका आणि NBFC आवश्यक कागदपत्रांच्या आधारे व्यावसायिकाला कर्ज देतात.
बिझनेस लोन बेनिफिट
स्पर्धेच्या युगात व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी आणि तो फायदेशीर बनवण्यात बिझनेस लोनचा मोठा वाटा आहे. याने व्यवसायाच्या आर्थिक गरजा तर पूर्ण होतातच, सोबतच करातही अनेक फायदे मिळतात. बिझनेस लोनमुळे कॅश फ्लो वाढतो. व्यवसायाच्या गरजांसाठी पैसा मदत करतो. पैशाची गरज अल्प व दीर्घ मुदतीसाठी भागवली जाते.
व्यवसायाचा विस्तार
जास्त रोख रक्कम ओतल्याने व्यवसायाचा विस्तार करणे शक्य होते. आपण नवीन उत्पादने विकसित करू शकतो आणि बाजारात आणू शकतो. बिझनेस लोनच्या आधारावर, तुम्ही तुमच्या सध्याच्या उत्पादनांची नवीन बाजारपेठेत जाहिरात करू शकता.बिझनेस लोन घेऊन खेळत्या भांडवलाच्या गरजा भागवता येतात.
व्यवसायावर नियंत्रण
जर तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या विस्तारासाठी भागधारक किंवा भागीदारांमार्फत पैसे उभे केले तर त्यांचा व्यवसायाच्या निर्णयात हस्तक्षेप वाढतो. याशिवाय त्यांना नफ्यातही वाटा मिळतो. याउलट, एखादी व्यक्ती बँका आणि NBFC कडून बिझनेस लोन घेऊ शकते आणि त्यांचा व्यवसायात इच्छेनुसार वापर करू शकते. यासह, तुमचे व्यवसायावर पूर्ण नियंत्रण असेल आणि नफ्यातही पूर्ण वाटा असेल.
क्रेडिट स्कोअर सुधारा
जर आपण आपल्या बिझनेस लोनची वेळेवर परतफेड केली तर त्यामुळे आपला क्रेडिट स्कोअर सुधारतो. यामुळे भविष्यात गरज पडल्यास कमी व्याजाने जास्त कर्ज घेण्यास मदत होते.