मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका 25 वर्षीय नराधमाने घराशेजारी राहणाऱ्या सहा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अमानुषतेचा कळस गाठत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. या आरोपीने पीडित मुलगी घरी एकटी असल्याचे पाहून तिला चॉकलेट देण्याचं आमिष दाखवून तिच्यावर सलग पाच दिवस लैंगिक अत्याचार केले आहेत. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईनं पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी या आरोपी नराधमा विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत 25 वर्षीय नराधमला अटक केली आहे. मुंबई पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी मुंबईतील एकाच परिसरातील रहिवासी आहेत. पीडित अल्पवयीन मुलीचे वडिल मासेमारीचा व्यवसाय करतात त्यामुळे ते जास्तवेळ घराबाहेर असतात. तसेच पीडित मुलीची आई घरकाम करते. त्यामुळे जास्त वेळा पीडित मुलगी घरी एकटीच असायची.
नराधम आरोपी हा बेरोजगार होता. घटनेच्या दिवशी पीडित मुलगी घरी एकटी असल्याचे पाहून आरोपीने या संधीचा फायदा घेतला. यानंतर आरोपी पीडित मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवून स्वतःच्या घरी घेऊन गेला. त्या ठिकाणी त्याने पीडित मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. एवढेच नाहीतर त्याने सलग पाच दिवस चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले. यादरम्यान पीडित मुलीच्या गुप्तांगात वेदना होऊ लागल्यानं तिने याची माहिती आपल्या आईला दिली. यानंतर पीडित मुलीच्या आईने तिला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली असता मुलीने घडलेला सगळा प्रकार आपल्या आईला सांगितला. यानंतर मुलीच्या आईने तातडीने पोलीस स्टेशनला जाऊन आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी पोक्सोसह अन्य कलमाअंतर्गत गुन्ह दाखल करून आरोपीला अटक केली व पुढील तपासाला सुरुवात केली.