हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने आमदारांच्या अपात्रतेचा निकाल दिल्यानंतर आता सर्वांचेच लक्ष राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सुनावणीकडे लागली आहे. या सुनावणीसाठी अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही गटातील सदस्यांना फेरसाक्ष देण्यासाठी 20 जानेवारीपासून बोलवण्यात येणार आहे. 25 जानेवारीपर्यंत दोन्ही गटाच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर हा निकाल विधानसभा अध्यक्ष 31 जानेवारीपर्यंत देणार असल्याचे म्हटले जात आहे.
गेल्या काही काळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंद करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीतील काही आमदार देखील बाजूला पडले आणि राज्यात अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले. सध्या या दोन्ही गटांमध्ये राष्ट्रवादी कोणाची यावरून वाद सुरू आहे. त्यामुळे या वादात दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात याचिका दाखल केले आहेत.
राष्ट्रवादीच्या प्रकरणांमध्ये एकूण 5 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. याच याचिका दोन गटांमध्ये विभाजित केल्या जाणार आहेत. आता या दोन्ही गटातील सदस्यांना फेरसाक्ष देण्याकरिता 20 जानेवारीपासून पुन्हा बोलवण्यात येणार आहे. पुढे 25 जानेवारीपर्यंत अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटाच्या बाजू ऐकून घेतल्या जातील. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आपला निर्णय राखून ठेवणार आहेत. परंतु विधानसभा अध्यक्षांकडून या याचिकांवर 31 जानेवारीपर्यंत निकाल देण्यात येईल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.