हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील आठवड्यत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथं झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या ३० पेक्षा जास्त आमदारांसह शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित दादांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असून शरद पवार गट आणि अजित पवार गट असं विभाजन झालं आहे. मात्र या सगळ्या घडामोडी म्हणजे फुल्ल टाईमपास असून शरद पवार यांनीच घडवलेलं नाटक आहे असा खळबळजनक दावा पवारांचे एकेकाळचे अत्यंत जवळचे जुने सहकारी आणि माळेगाव साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांनी केला आहे.
पवार कुटुंबातील फूट हा फक्त दिखावा आणि टाईमपास आहे. लोकांना दाखवण्यासाठी ही फूट आहे. हे सगळं नाटक हे 2024 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत सुरु असणार आहे. तोपर्यंत सगळ्या चौकशीतून क्लीन चिट घ्यायची हाच यामागील खरा डाव आहे असे चंद्रराव तावरे यांनी म्हंटल आहे. पवारांची कला संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे कोणी कुठंही गेलं तरी काही दिवसांनी सगळे एकाच ठिकाणी असणार आहेत, असेही तावरे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, मी गेल्या ४० वर्षांपासून पवार कुटुंबियांसोबत होतो. त्यामुळे प्रत्येकाचे स्वभाव मला माहीत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार हे भाजपसोबत 90 जागा लढवणार आणि शरद पवार यांच्या जागा एकत्र घेऊन महाराष्ट्रात राष्ट्रवादीचं सरकार आणणार असा दावाही चंद्रराव तावरे यांनी केला आहे. त्यांच्या या खळबळजनक दाव्याने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चाना उधाण आलं आहे.